मुखपृष्ट  |  लॉगीन  | अभिप्राय  |  संपर्क

|| चैतन्याची आभा - शेगावचे श्री गजानन महाराज ||ॐ गुरु श्रीगुरु गजानन सदगुरू |
सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ||
स्वर्गीचा हा देव, भुलोकी प्रगटला ! संताचिये रूपे आला, शेगावात ||
निजलिले केली, अनंताची उधाठेव | भक्ता शेगाविचा देव , गजानन ||

माघ वद्य सप्तमी शके १८०० म्हणजे दि . २३/२/१८७८ रोजी महाराष्ट्रातील वर्हड़ प्रांतात शेगाव ग्रामी एक दैदिप्यमान तारा उदयास आला . प्रत्यक्ष चैतन्य भर दुपारी १२ वाजता अवतरित झाले . अंगात जुनी पुराणी बंडी , पाणी पिण्यासाठी कमंडलू सारखा एक भोपळा, कच्ची चिलीम , दिगंबर अवस्थेतील एक अत्यंत तेजस्वी परब्रम्ह अवतरले

सुगुण सावळे रूप मनोहर | शेगावीचा हा देव दिगंबर |

अजानुबाहू देह चिन्मय | करी चिलीम तुंबा पाथेय |

प्रगट अयोनी संभव अवतार | शेगावीचा हा देव दिगंबर |

या परब्रम्हाच्या मुखात सतत गणि गण गणात बोते हे पद असे , म्हणूनच श्री गजानन महाराज या नावाने हे चैतन्य ओळखले जाऊ लागले . महाराज स्वयंभू आहेत , अयोनीसंभव प्रगट झालेले आहेत .

गणि गण गणात बोते | केला जगासी उपदेश ||१||

जीव शिव एक संबोधन | तूच झाला आम्हा गजानन ||

[ गजाननाचिये द्वारी - पायवाट गजाननाची ]

सदगुरु श्री गजानन महाराज १६ ते १८ वर्षाचे असताना अक्ल्कोट येथे श्री स्वामी समर्थांकडे गेले होते स्वामी समर्थांनी या बालकाला कपिलधारा येथे महंत रघुनाथदास यांच्याकडे पाठविले सदगुरुंनी कपिलधारा येथे तपाचा श्री गणेशा स्वहस्ते गणपतीची मूर्ति स्थापन करून केला १२ वर्ष तेथे तपश्चर्या केली. पुन्हा अककलकोट येथे स्वामींकडे महाराज आले . त्यावेळेस स्वामींनी सांगितले , " देवमामलेदाराकडे जा "| तेथे स्वतःला घासून घे ! म्हणजे उजळुन निघशील आणि तेथून आज्ञा घेवून उगावतिकडे ( पूर्वेकडे ) पळ . जेथे थांबशील ते शेगाव बस !

माझासारखे माझ्याशी चाळे करत नाव नाही न गाव नाही |

लोक म्हणतील ते नाव |

संत श्री गजानन महाराजांनी आपल्या अवतार कार्यासाठी शेगाव ही भूमि निवडली . व त्याच ठिकाणी त्यानी अनंत लीला केल्या नासिकाग्रावर दुष्टि स्थिर असलेले व तप सामर्थ्याचे तेज अंगी असलेले , अजानुबाहू , डोळ्यात विलक्षण तेज असे हे तपस्वी योगयोगेश्वर होते .

मुद्रा अलक्षित मनी विश्वप्रित | मोक्ष चरणात लोटांगतो ||२ ||

भुषण अलंकार न सोंदर्य साकार | विदेही आकार ब्रम्हरूप ||३||

सुंदारासी ध्यान अमृताचे पान | स्वर्गसुख नाम भक्तजनां ||४||

ताराया वैष्णव समाधी संजीव | भवैकुंठी शेगाव स्थिरावला ||५||

[ गजाननाचिये द्वारी - चैतन्यरूप गजानन ]

सर्व सामान्य भक्तांना त्यांच्या दुष्टिला दुष्टि भिडवणे कठिणच होते , महाराजांच्या भाव मुद्रा वेगवेगळया असायच्या ते नेहमी ब्रम्हानंदि तल्लीन असत . भक्तांच्या मनाचा ते अचूक वेध घेत असत , भक्तांच्या मानत काय चालले आहे ते जाणून ते क्षणार्धात कृपा करीत किवा त्यांच्या मनातील प्रश्नाला उत्तर देत ( संदर्भ - श्री गजानन महाराज चरित्र कोश )

श्री. गजानन महाराज फ़ारच कमी बोलत त्यांचे बोलणे असंबद्ध व गूढ़ असायचे , त्यांचे शब्द म्हणजे परावाणीतून प्रसवणारे शब्दब्रम्ह होते . महाराजांना मराठी , हिंदी , इंग्रजी , संस्कृत , तेलगू आशा विविध भाषा अवगत होत्या. भक्तांशी या भाषांमधून ते संवाद करीत असत .

महाराज मन मानेल तेथे फिरत असत. वाटेल तेथे बसत कधी नाल्याच्या काठी तर कधी कोणाच्या ओटयावर बसत महाराज हे जीवन मुक्त विदेही प्रत्यक्ष परब्रम्ह स्वरुप होते . हा अवतारच मुळी विदेही असल्याने त्यांच्या लीला त्या अवातारस धरून असत .

वेदांच्या ऋचा उदात्त - अनुदात्त स्वरांसहित ते अस्खलितपणे म्हणत असत . तर कधी अचानक मौन धारण करीत त्यांची वेदाक्षरे वैदिकांनी ऐकली तर ते देखिल साशंक होत असत . संगीताची त्यांना अतिशय आवड होती .

भोलानाथ दिगंबर हे दुःख मेरा हरो रे |

चंदन चावल बेलकी पातिया शिवजी के माथे धरो रे ||

हे संत मीराबाईचे पद महाराजांना फार आवडायाचे.

महाराजांना दाभिंकाचा तिटकारा होता दिखाऊपणाचा त्यांनी निषेध केला . म्हणूनच घुडे या भक्ताला महाराज वदले .

म्हणशी माझे काही न उरले | मग हे रूपये कोठून आणले |

लक्ष्मणा ऐसा चाळे | दंभिकपणाचे करू नको ||

{ श्री गजानन विजय . अं .१० / ओ .क्र १५६ }

निसर्गधर्माचे पालन करण्यावर त्यांचा भर असायचा

निसर्गधर्माचे करावे पालन | जरी आत्मज्ञान नाही गाठी

{ कैवाल्याचे धाम अं . क्र १६ }

देश व धर्म या दोहोंवर प्रेम व निष्ठा असावी हा त्यांचा महत्वपूर्ण संदेश त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून लोकांना दिला महाराजांना अंधश्रद्धा मान्य नव्हती . देवाने माणसाला दिलेल्या बुद्धीचा योग्य उपयोग व्हावा असा त्यांचा कटाक्ष असायचा हे बर्‍याचशा लीलांमधून स्पष्ट होते .

महाराज आपल्या भक्तांबरोबर पंढरपूर येथे श्री विठ्ठल माऊलीच्या दर्शनाला जात असत . महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पुरस्कार केला व भक्तिमार्गाचा अवलंब केला व अनेक लोकाना या भक्तिमार्गातुन प्रत्यक्ष परमेश्वर दर्शनाचा लाभ करून दिला

बापूंना झाला विठ्ठल सगुण | बापुस दिलेसे दत्तदर्शन |

शंकरबुवे झाला रघुनंदन | माझ्या ह्रदयीचा देव गजानन ||२||

पुंडलिकभक्ता राधामोहन | पितांबरा झाला भक्तभूषण |

बाळकृष्णे दिले समर्थदर्शन | माझ्या ह्रदयीचा देव गजानन ||३||

बाळाशास्त्रे झाला उमारमण | निमोणकरासी श्री गजानन |

गणेश कुळा केले सेवे पावन | माझ्या ह्रदयीचा देव गजानन ||४||

[ गजानानाचिये द्वारी माझ्या ह्रदयीचा देव गजानन ]

श्री गजानन महाराजांचे तत्कालीन सर्व साधू संताशी अतिशय प्रेमाचे संबध होते . हे त्यांच्या लिलांमधुन व संपूर्ण चरित्रातून आपल्या लक्षात येते . अध्यात्म मार्गातील योग्य भक्ति व कर्म या कोणत्याही मार्गातील संत असो त्यांच्या बद्दल सदगुरुंनी सांगितले की .

या अवघ्या संताचे | आचरण भिन्न प्रकारचे |

परी अधिकारी कैवाल्याचे | ते बैसले होउनी ||

[ श्री गं . अं. क्र १९/१२२ ]

आम्ही ही भावंडे सारी | येतो झालो भूमीवरी |

कैवल्याच्या मर्गावारी | भाविक आणून सोडावाया ||

[ श्री गं . अं. क्र १९/१२४ ]

'अन्नं न परिचक्षीत ' असा उपनिषदाचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दाखवातच हे परब्रम्ह शेगावी अवतरले . गोविंदबुवांच्या किर्तनातील उत्तररंगातील हंसगीतेतील || यथा भूतानि भूतेषु - बहिरन्त : स्वयं तथा || अशा प्रकारची ब्रम्हवाणी वदून या अवतारी पुरूषाने असे सोहंरूप प्रगट केले .

बकटलाल अग्रवाल या भक्ताने महाराजांमधील साधुत्वाचा ' अंश ' जाणला. त्यांनी महाराजांच्या सेवेत आपले आयुष्य पूर्णपणे घालवले . या भक्ताला सदगुरुंनी अद्वैत्य ज्ञान प्राप्त करून दिले . आणि मोक्षाचा मार्ग खुला करून दिला .

आचरुन कर्मफल | टाकिता भेटतो घननीळ |

त्यांच्या अंगी न लागे मळ | या कर्माचा केव्हाही ||

[ श्री . गं. वि . अं. क्र ६ / १२० ]

असा उपदेश वज्रभूषण यांना महाराजांनी दिला सदगुरु श्री गजानन महाराजांच्या अंतरंगातील भक्त पुंडलिक भोकरे यांना आपणा जैसे करिती तात्कळ | या उक्तिप्रमाणे संतत्व पदाला नेले .

डॉ . भाऊ कवर यांचे महाराजांवर निस्सीम प्रेम होते त्यांच्या जीवनात महाराजांनी ज्या काही लीला केल्यात त्या सर्वांचा विचार करता मी भक्त तू देवे ऐसे करी | या संतवचनाची प्रचिती येते .

सदगुरु गजानन महाराजांचा परम भक्त भास्कर पाटील या भक्ताचे सेवेचे फल म्हणजे.

ऐसा योग न शास्त्राने कथिला | गुरुने शिष्य समाधिस्थ केला |

शिष्यचेही कराविले पूजन , कौतुक देखिले दूर बैसोन | भास्कर शिष्य वैकुंठी धाडीला ||४||

[ गजानाच्या द्वारी / गौरुचा महिमा ]

सदगुरु गजानना महाराजांचे निष्ठावंत भक्त

स्वामी दत्तात्रय केदार | दुसरा नारायण जामकार |

निव्वळ दुधाचा ज्यांचा आहार | तो दुधाहारी बुवा ||

ऐसे श्रोते तिघे जण | स्वामींचे भक्त निर्वाण |

ज्यांनी आपुले तनमन | समर्थ चरणी आर्पिले

[ श्री गं . अं. क्र १९/१५५/१५६ ]

आत्मारामपंत या भक्ताची महाराजांवर अतिशय निष्ठा होती आजही सदगुरु गजानन महाराज आपल्या भक्तांना सतत संभाळत फक्त आपण महाराजांवर निष्ठा व प्रेम , श्रद्धा ठेवावी

श्री गजानन योगिराज | समर्थ आपुल्या भक्तांसी |

रक्षण करिती अहर्निशी | निष्ठा मात्र त्यांचेविषयी |

दृढतर पाहिजे मनात | { श्री गं .वि. अं. क्र २० / ओं . क्र १०९ }

श्री संत दासगणू महाराजांनी श्री गजानन विजय हा ग्रंथ ओवीबध्द रसाळ असा लिहून समस्त भक्तगणांनसाठी सदगुरुंचे भक्तिवलय प्रकाशमान केले . आपण सर्वानी या ग्रंथाचे परायण करून महाराजांच्या कृपा आशीर्वादाचा लाभा घ्यावा आणि दासगणूंनच्या भाषेत सांगायचे म्हणजे

श्री गजाननलीलेचा | पार कधी न लागायचा |

अंबरीच्या चांदण्यांचा | हिशेब कोणा न लागे कधी

[ श्री गं . अं. क्र २० / १०३ ]

आशा प्रकारच्या आजपर्यंत सदगुरु श्री गजानन महाराजांच्या ज्या लीलांवर प्रकाशझोत आला नव्हता . त्या लीला प्रकाशमान करण्याचे कार्य सदगुरुंनीच श्री दासभार्गवांकडून करून घेतले . त्यानी अखंड १२ वर्षे संशोधन करून श्री संत गजानन महाराज चरित्र कोश हा ग्रंथराज लिहून सर्व भक्तांच्या हृदयातील महाराजांची भक्ति दृढतर करण्याचे अमूल्य असे कार्य केले

सर्व सदगुरु श्री गजानन परिवारातील भक्तांनी हा ग्रंथराज पठण करून गजानन भक्तीचा आंनद लुटावा व आपली सदगुरुंवरील भक्ति दृढ व्हावी हिच गजानन भक्तांकडून गजानान भक्तांना - अमूल्य भेट

गुरुब्रिदे ध्यास तत्वाचा प्रवास |

भक्तीचा प्रयास सोडू नये ||३||

गजानना चरणी नामाचे चिंतनी |

चित्त भार्गवांनी ठेवविले ||४||

[ भावतरंग - अं . क्र . ६३ ]

|| श्री गजानन | जय गजानन ||